Home Maharashtra विदर्भातील शाळा आता १५ जून ऐवजी सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू...
विदर्भातील शाळा आता १५ जून ऐवजी सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार.
एस.के.टीव्ही न्युज
नागपूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने ९ जून २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या सुधारित आदेशानुसार, विदर्भातील तीव्र उन्हाळा आणि वाढते तापमान लक्षात घेता तेथील शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भातील शाळा आता १५ जूनऐवजी सोमवार, २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा नेहमीप्रमाणे सोमवार, १५ जून २०२६ पासूनच नियमित वेळेत सुरू होतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आधी सर्व शाळा १५ जून रोजी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, विदर्भातील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
ही बाब समोर आली होती. विदर्भातील या कडक उन्हाचा विचार करता शाळा सुरू करण्याबाबत ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, पुणे’ व इतरांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका (Writ Petition No. 4067/2026) दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे
शाळा सुरू होण्याची तारीख आता अशी राहणार. विदर्भातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार, दिनांक २२ जून २०२६ पासून सुरू होतील. २२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत विदर्भातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवल्या जातील,जेणेकरून दुपारच्या कडक उन्हाचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही.
१ जुलै २०२६ पासून विदर्भातील शाळा पूर्ववत पूर्ण वेळेत आणि नियमित वेळापत्रकानुसार भरती.या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, हा बदल केवळ विदर्भ विभागासाठी लागू राहील.
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील सर्व शाळा पूर्वघोषित वेळापत्रकानुसार सोमवार, १५ जून २०२६ पासूनच नियमित वेळेत सुरू होतील.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ.महेश पालकर आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. विदर्भातील सद्यस्थितीतील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हितावह नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि बृहन्मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
error: Content is protected !!