Home Chandrapur वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.
वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.
एस.के.टीव्ही न्युज
वरोरा : वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे काल दुपारनंतर झालेल्या वादळी वातावरणात आकाशीय वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.नितीन चंद्रशेखर डुडरे वय,४० वर्ष असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,नितीन डुडरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतीकामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याचा वारा तसेच मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डुडरे यांनी शेतातीलच एका झाडाचा आसरा घेतला आणि ते तिथे थांबले.
ते झाडाखाली थांबले असतानाच अचानक त्यांच्यावर आकाशीय वीज कोसळली.या भीषण आघातामुळे ते गंभीररित्या भाजले गेले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील अन्य शेतकरी आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी शेताकडे धाव घेतली; परंतु वीज एवढ्या तीव्रतेने कोसळली होती की, नितीन डुडरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत घटनेचा रीतसर पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
नितीन डुडरे यांच्या निधनामुळे एकार्जुना गावावर दुःखाचे डोंगर कोसळले असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृत शेतकरी कुटुंबाचा मुख्य आधार असल्याने, शासनाने या पीडित कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.
error: Content is protected !!