Home Breaking News खेडी परिसरात असलेल्या या कळपाने सावली च्या गाव तलावात 32 हत्तींच्या कळपाने...
खेडी परिसरात असलेल्या या कळपाने सावली च्या गाव तलावात 32 हत्तींच्या कळपाने मुक्काम ; शहरासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ.
एस.के.टीव्ही न्युज
सावली : सावली शहरालगतच्या गाव तलाव परिसरात दिनांक,8 जून सोमवार रोजी सकाळी 6.30 वाजता तब्बल 32 हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकल्याने शहरासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.शहराच्या अगदी जवळ हत्तींचा कळप स्थिरावल्याची माहिती पसरताच नागरिकांनी मोठ्या तलाव परिसराकडे धाव घेतली.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभाग व पोलिस विभागाने परिसरात विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.जंगल परिसरातून आलेला हा कळप सकाळपासून मोठ्या तलाव परिसरात विसावला असून, दुपारपर्यंत तेथेच मुक्कामी होता.कळपात मोठ्या हत्तींसह पिल्लांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
हत्तींच्या हालचाली पाहण्यासाठी सावली शहरासह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी तलाव परिसरात गर्दी केली. अनेकांनी सुरक्षित अंतरावरून हत्तींचे निरीक्षण केले, तर काही ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी वनविभाग आणि पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागली.
यापूर्वी पहाटे पर्यंत खेडी परिसरात असलेल्या या कळपाने सावली शहराच्या दिशेने मार्गक्रमण केले.वाटेत संजय कावळे यांच्या शेतातील भेंडी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वनविभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कळपाच्या मागावर होते.पहाटेच कळपाने शहराच्या दिशेने कूच केल्याने वन अधिकार्यांची चांगलीच धावपळ उडाली.
हत्तींच्या वाढत्या वर्दळीच्या पृष्ठभूमीवर कळपाला सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी पश्चिम बंगाल येथील हत्ती तज्ज्ञ श्याम टॅटू यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वनविभागाने नागरिकांना हत्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, सेल्फी किंवा व्हिडिओसाठी गर्दी करू नये, तसेच कळपाच्या हालचालींमध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन केले आहे.
सध्या हत्तींचा कळप शांत असला तरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
error: Content is protected !!