Home Breaking News वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांची बोट उलटून दोघांचा बुडून मृत्यु. ...
वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांची बोट उलटून दोघांचा बुडून मृत्यु.
📍 पाच जणांनी पोहत निघाल्याने जीव वाचला.
एस.के.टिव्ही न्युज
भंडारा : भंडारा तालुक्यातील करचखेडा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर इतर पाच जणांनी प्रसंगावधान राखत पोहत किनारा गाठून आपला जीव वाचवला.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी (७ जून) सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास सात जण खासगी बोटीने वैनगंगा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ आटोपून परत येत असताना नदीच्या मध्यभागी अचानक बोट असंतुलित होऊन पलटली. या अचानक घडलेल्या दुर्घटनेत सर्वजण पाण्यात फेकले गेले.
यावेळी पवन मुरली चौबे वय,34 वर्ष रा.आंबेडकर वार्ड, भंडारा) आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे वय,26 वर्ष रा. चांदणी चौक,भंडारा) हे दोघेही खोल पाण्यात बुडाले.
आकाश केवट वय,27 वर्ष,सुबोध विलास ढोक वय,26 वर्ष,काशीनाथ फत्तू मेश्राम वय,32 वर्ष,मृनाल बाळकृष्ण मंदुकर वय,20 वर्ष आणि अर्जुन मोतीराम मेश्राम वय,29 वर्ष यांनी प्रसंगावधान राखत पोहत नदीबाहेर येण्यात यश मिळविले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार जिल्हा शोध व बचाव पथकाला त्वरित पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि अंधारामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे करचखेडा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी नदीपात्रात बोटीद्वारे प्रवास करताना आवश्यक सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह धोकादायक होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त होत आहे.या प्रकरणी पुढील तपास सुरू असून प्रशासनाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
error: Content is protected !!