
नागपूर : समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारकरी संप्रदाय आणि नमाज पठण याविषयी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाला काँग्रेसने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजपचे नागपूरचे आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ‘अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत’ या आरोपावर प्रत्युत्तर देताना संदीप जोशी यांनी, काँग्रेस आणि मुस्लिम लीग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा पलटवार केला आहे.
वडेट्टीवारांनी भाजपवर टीका करताना म्हटले होते की, अबू आझमी हे एक पिल्लू सोडतात आणि भाजप हिंदू-मुस्लिम भांडण लावतात. या विधानाला उत्तर देताना जोशी म्हणाले, वडेट्टीवारांनी आधी काँग्रेसचा इतिहास पाहावा. 1947 मध्ये देशाची फाळणी घडवून आणणाऱ्या मुस्लिम लीगसोबत काँग्रेसचे राजकीय मतभेद आजही दिसत नाहीत. उलट तुष्टीकरणाचे धोरण आजही काँग्रेस चालवत आहे.
या संदर्भात बोलताना आ. संदीप जोशी यांनी 2006 साली मुंबईत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. त्या कार्यक्रमात मुस्लिम लीगचे नेते काँग्रेसच्या व्यासपीठावर होते आणि राष्ट्रगीताला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला होता. हीच ती मानसिकता आहे, जी आजही काँग्रेसमध्ये खोलवर रुतलेली आहे, असे शब्दात आमदार जोशी यांनी वडेट्टीवार यांचा समाचार घेतला.
जोशी यांनी स्पष्ट केले की, अबू आझमी कोणाच्या दबावातून वक्तव्य करतात हे सर्वज्ञात आहे. मात्र काँग्रेस अशा वक्तव्यांना राजकीय हेतूने वापरत आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, हे काँग्रेसचे जुनेच धोरण असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.




















