
चंद्रपूर : शहरात पर्यावरणपूरक पर्यटन आणि नागरिकांसाठी निसर्गस्नेही जागा उपलब्ध व्हावी या हेतूने सावनेर येथील ‘इको पार्क’च्या धर्तीवर चंद्रपूरमध्येही ‘इको पार्क’ उभारण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेत संभाव्य ‘इको पार्क’च्या जागेची पाहणी केली. ‘इको पार्क’ साकारण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत प्रक्रिया गतिशील करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी वेकोलिचे योजना अधिकारी प्रिया शंकर विना, अमला खनन ऑफिसर उज्ज्वल बोढे, लालपेठ उपक्षेत्रीय प्रबंधक मुस्ताक अहमद, पर्यवेक्षक अधिकारी शुक्ला, सुभाष ताजने, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रित विशेष सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देतवळे, बलराम डोडाणी, रवी गुरनुले, मनोज पाल, माजी नगर सेवक प्रदीप किरमे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुले, अमोल शेंडे, रंजन ठाकुर, सुमित बेले आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील ‘इको पार्क’ला भेट देऊन तेथील यशस्वी मॉडेलची पाहणी केली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पार्कच्या रचना, संकल्पना आणि व्यवस्थापन यांचा सविस्तर अभ्यास केला. सावनेर ‘इको पार्क’मध्ये साकारण्यात आलेली कोळसा खाणी विषयक वेकोलिची माहितीपर प्रदर्शनी, हरित पट्टे, जलाशय आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक तंत्रे यांचा अनुभव घेऊन आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरमध्येही असेच आधुनिक आणि निसर्गाभिमुख ‘इको पार्क’ उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. दरम्यान, आज चंद्रपूर येथील वेकोलिच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वेकोलि आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करत प्रारंभिक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत जमिनीची निवड, सविस्तर विकास आराखडा, पर्यावरणीय मानके आणि सार्वजनिक सहभाग यासंदर्भात विचारमंथन करण्यात आले.
बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी शहरातील जमनजट्टी परिसरातील वेकोलिच्या मालकीच्या जागेची पाहणी केली. या भागातील रिवलबेल्ट कॉरी याचीही त्यांनी पाहणी केली. येथे जुनी खुली कोळसा खाण असून त्यात पावसाचे आणि नदीचे पाणी साचले आहे. हे निळ्या रंगाचे सुंदर पाणी असून येथे नैसर्गिक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यातून एक सुंदर निसर्गरम्य जलाशय तयार झाला आहे. परिसरात घनदाट वृक्षराजी, जलचर आणि पक्ष्यांचे अस्तित्व लक्षात घेता ही जागा नैसर्गिक ‘इको पार्क’साठी अत्यंत अनुकूल स्थान असल्याचे आमदार किशोर जोगरेवार यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सदर जागा ‘इको पार्क’साठी लक्षात घेण्याच्या सूचना दिल्या असून तातडीने सविस्तर सर्वेक्षण व विकास आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. चंद्रपूर शहरात पर्यावरण आणि पर्यटन अंगांनी नागरिकांना लाभ देणारा हा प्रकल्प असून सर्व विभागाने प्रामाणिकपणे यात काम करत हे ‘इको पार्क’ प्रत्यक्षात साकार करावे, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.





















