Home Top News आ.विनायक मेटेंची शिवसंग्राम फोडण्याचा प्रयत्न

आ.विनायक मेटेंची शिवसंग्राम फोडण्याचा प्रयत्न

0
69

शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत हे शिवसंग्राम पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतायत-तानाजी शिंदे

प्रारंभ । वृत्तसेवा

सोलापूर : आमच्या पक्षाच्या अध्यक्षाचं अपघाती निधन झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत हे शिवसंग्राम पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी हा आरोप केलाय. विनायक मेटे यांच्या निधनानंतर पक्षावर संकट आलं असताना शिंदे गटाकडून हा पक्ष फुटल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वापरलं जातंय, त्यामुळे शिंदे यांनी याची दखल घ्यावी, असा इशारा तानाजी शिंदे यांनी दिला आहे.
तानाजी शिंदे यांनी काल सोलापूरमध्ये हा इशारा दिला. शिवसंग्राम संघटनेने यासाठी मंत्री उदय सामंत यांना जबाबदार धरलंय. ते म्हणाले, उदय सामंत यांनी शिवसंग्रामचे पदाधिकारी शिंदे गटात येत असल्याची खोटी माहिती माध्यमांना दिली. सामंत यांची ही भूमिका न पटणारी आहे
उदय सामंत यांनी उल्लेख केलेल्या कार्यक्रमात शिवसंग्रामचा केवळ एकच पदाधिकारी होता. बाकी कुणीही नव्हतं. पण याची कोणतीही खातरजमा न करता शिवसंग्रामचे पदाधिकारी असल्याचं सामंत यांनी म्हटल्याचा आरोप तानाजी शिंदे यांनी केला.
2014 पासून शिवसंग्राम ही संघटना भाजपासोबत घटकपक्ष म्हणून काम करते. मात्र काही महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. यामुळे पक्ष दुःखात असताना शिंदे गटातर्फे असे प्रयत्न होणं खेदजनक आहे

तानाजी शिंदे यांचा इशारा

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मंत्री शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मित्रधर्म पाळत नाहीत, असाच अर्थ निघतो असा सूचक इशारा तानाजी शिंदे यांनी दिला. उदय सामंत यांनी सांगितलेल्या महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष किंवा सोशल मीडिया प्रमुख यापैकी कुणीही त्यांच्यासोबत नव्हते. तरीही उदय सामंत यांनी त्यांचा राज्याला अशा प्रकारे परिचय करून दिला. या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाजात शिंदे गटाबाबत तीव्र भावना उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here