
सोलापूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन झालं आहे. मारुती चितमपल्ली यांचे पुतणे श्रीनिवास चितमपल्ली यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
वयाच्या 93 व्या वर्षी मारुती चितमपल्ली यांनी सोलापूर येथे अखेरचा श्वास घेतला. नुकतंच 28 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
जीवनप्रवास
मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूरमध्ये एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात झाला होता. मारुती भुजंगराव चितमपल्ली हे त्यांचे पूर्ण नाव आहे. चितमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता. शिक्षणाचं महत्त्व ते जाणून होते. आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावं ही त्यांची इच्छा होती.
चित्तमपल्ली यांनी कोईम्बतूर येथील स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात 36 वर्षांहून अधिक काळ सेवा केली. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये काम केलं आहे.
वन्यजीव संरक्षणात त्यांचं योगदान मोठं आहे. नागझिरा आणि मेळघाट येथे विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारण्यास त्यांनी मदत केली. मारुती चितमपल्ली यांना 18 भाषा यायच्या. त्यामध्ये संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचा समावेश आहे.
त्यांनी आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव आपल्या 21 ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. त्यांनी ललितगद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्मय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांत लेखन केलं आहे.
पक्षी जाय दिगंतरा (1983), जंगलाचं देणं (1985), रानवाटा (1991), शब्दांचं धन (1993), रातवा (1993), मृगपक्षीशास्त्र (1993), घरट्यापलिकडे (1995), पाखरमाया (2000), निसर्गवाचन (2000), सुवर्णगरुड (2000), आपल्या भारतातील साप (2000), आनंददायी बगळे (2002), निळावंती (2002), पक्षिकोश (2002), चैत्रपालवी (2004), केशराचा पाऊस (2005),चकवाचांदण : एक वनोपनिषद (2005), चित्रग्रीव (2006), जंगलाची दुनिया (2006), An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev (2000), नवेगावबांधचे दिवस (2010) अशी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली.
चितमपल्ली हे मुळात पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक आहेत. अरण्य जीवनावरील अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली होती.
चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी हानी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“निसर्गाला शब्दरूपांनी साजिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदे विषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारूती चितमपल्ली अजरामर राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणारे चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दीपस्तंभ निमाला आहे”, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्पण केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे की, “वन विभागात काम करताना चितमपल्ली यांनी आगळा दृष्टीकोन बाळगून काम केलं. त्यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून शब्दांनी चितारल्या. त्यासाठी त्यांनी गाढा अभ्यासही केला. आदिवासी तसेच राना-वनात राहणाऱ्या बांधवांकडे असलेले निसर्गाविषयीचे ज्ञान त्यांच्यामुळेच शब्दबद्ध झाले. पक्षितज्ज्ञ, निसर्गलेखक, वन्यजीवांचा अभ्यासक अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांच्यामुळे मराठी भाषेला राना-वनातील, निसर्गाशी निगडीत अस्सल असे शब्द मिळाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच चकवाचांदण- एक वनोपनिषद असे होते. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी संस्कृतचाही अभ्यास केला.”
“सोलापूरला झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांचे निसर्गाविषयीचे लेखन, अभ्यास- संशोधन, पक्षिकोश अशी साहित्य संपदा मराठी भाषेचे वैभव वाढणारे संचित आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक अमुल्य असा ठेवा आहे.
“दिवंगत चितमपल्ली यांचा सोलापूर ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते सोलापूर असा प्रवास राहीला आहे. विदर्भातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. जंगलातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध राहीले आहेत. या सगळ्या प्रवासात ते आयुष्यभर निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहीले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील निसर्ग अभ्यासक, तसेच साहित्य क्षेत्रासाठीचा दिपस्तंभ निमाला आहे, ही एक मोठी हानी आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
विदर्भातील वनसमृद्धी सोप्या भाषेत मांडली – ना. नितीन गडकरी
मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण करताना ना. नितीन गडकरी म्हणाले, “ज्येष्ठ साहित्यिक वनऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली जी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. निसर्ग तसेच पर्यावरणाशी नाळ जोडलेले साहित्यिक चितमपल्ली यांचे विदर्भात वन्यजीव व वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातींच्या जतन व संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. प्राणी-पक्षी यांच्या डिक्शनरीसह पर्यावरणाशी संबंधित अनेक रसग्रहणपर पुस्तके त्यांनी लिहिली.”
पुढे त्यांनी म्हटलंय की, “भारतीय वन आणि वन्य जीवनामध्ये असलेले वैविध्य जगात कुठेही नाही, हे चितमपल्ली यांनी आपल्या लेखनातून सांगितले. विदर्भातील वनसमृद्धी सोप्या भाषेतून आपल्या साहित्यात आणून त्यांनी निसर्गाला आपल्या आणखी जवळ आणले. निसर्गावर प्रेम करून त्याचे रक्षण करण्यासाठीचा वस्तुपाठ त्यांनी आपल्याला घालून दिला आहे. निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करणे, हीच त्यांना योग्य आणि सार्थ श्रद्धांजली ठरेल. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”




















