चंद्रपूर शहरातील युवकांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेलं ‘अम्मा की पढाई’ हे केंद्र म्हणजे केवळ एक अभ्यासिका नव्हती, ती होती आशेचा किरण. एका आमदाराने आपल्या मतदारसंघातील मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं, त्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रयत्न करावा हे आजच्या राजकारणात दुर्मीळच म्हणावं लागेल.
पण दुर्दैव म्हणजे, या केंद्राच्या पाठीमागे असलेल्या सकारात्मक उद्देशावर विरोधकांनी राजकीय कुरघोडी करण्यासाठी वार केले. काँग्रेससारख्या पक्षाने या प्रकल्पावर केलेली टीका म्हणजे त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. ‘अम्मा चौक’ आणि ‘अम्मा की पढाई’ यावरून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. सत्तेपासून दूर गेलेल्या काँग्रेसने, आता विकासावर बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून त्यांनी शुद्ध राजकारणासाठी शिक्षण क्षेत्रालाच गालबोट लावण्याचं ठरवलं का?
ही टीका इतकी अश्रद्ध होती की, त्यात आम आदमी पार्टीसारखा पक्षही उडी मारून गेला. कोणत्याही पार्श्वभूमीची माहिती न घेता फक्त टीकेसाठी त्यांनी आपलं बोट उठवलं. पण या सर्व राजकारणात हरवला तो विद्यार्थी. त्या मुलाचा आवाज दाबला गेला जो रोज दूरवरून फक्त अभ्यास करण्यासाठी येत होता.
सर्वात दु:खद बाब म्हणजे, ‘अम्मा की पढाई’सारखा अत्यंत उपयुक्त आणि यशस्वी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय आमदार जोरगेवार यांना घ्यावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत शिक्षणप्रेमी आमदाराने सुरू केलेल्या उपक्रमावर जेव्हा जातीय किंवा राजकीय डाग टाकले जातात, तेव्हा समाज म्हणून आपण कुठे चाललोय याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं.
हा विरोध केवळ काँग्रेसपुरता मर्यादित नाही. स्थानिक राजकारणात बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वर्चस्वही त्यामागे आहे, हे स्पष्ट आहे. ‘माझ्या मतदारसंघात कोणी उभं राहू नये’ हा अहंकार जर काही राजकारण्यांना असेल, तर मग जनतेच्या हिताची कामं कुठे होतील?

काँग्रेसला जर खरोखर शिक्षणाची चिंता असती, तर त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन त्याचे गुण वाढवले असते. पण त्यांच्या राजकारणाला शिक्षणाची किंमत नाही – त्यांना फक्त श्रेय हवंय, काम नको.
‘अम्मा की पढाई’ या उपक्रमावर टीका करताना विरोधकांनी त्यांच्या मानसिकतेचा खरा चेहरा दाखवला. शैक्षणिक क्रांतीला राजकीय रंग लावून त्यांनी या केंद्राचं खच्चीकरण केलं. कारण त्यांना त्रास झाला की, शिक्षणाच्या नावावर गाजावाजा करणाऱ्यांच्या घोषणा बंद पडल्या आणि प्रत्यक्ष कृती करणारा एक कार्यकर्ता समोर आला!
पण प्रश्न एवढाच नाही. या राजकारणामध्ये बळी कोण गेला? बळी गेला तो गरीब घरातून आलेला, दिवसरात्र मेहनत करणारा विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्नं होती, त्याच डोळ्यांत आज चिंता आहे. कारण काही लोकांच्या राजकीय पेट्यांमध्ये त्यांचं भविष्य कव्हर स्टोरी ठरलंय!
एक गोष्ट स्पष्ट आहे, ही लढाई केवळ राजकीय आरोपांची नाही, ही लढाई आहे कृती करणाऱ्यांविरुद्ध केवळ बोल करणाऱ्यांची!” एकीकडे केवळ भाषणांमध्ये, घोषणा फडकवण्यात माहीर लोक, आणि दुसरीकडे शिक्षणासाठी स्वतःहून काहीतरी करून दाखवणारा नेता.
आमदार किशोर जोरगेवार यांचं योगदान केवळ शिक्षणपुरतं मर्यादित नाही, ते एक मूल्य आहे; जिथे बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न आहे. ‘धम्मदीक्षा’ ही केवळ धार्मिक घटना नाही, ती सामाजिक परिवर्तनाची मशाल होती. ‘अम्मा की पढाई’ ही त्याच मशालीची पुढली ठिणगीच होती. पण राजकीय अंधश्रद्धांनी ती ठिणगी दाबण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी नीच पातळीवर टीका केली.
आज ‘अम्मा की पढाई’ बंद झाली असली, तरी तिची गरज संपलेली नाही. उलट अशा उपक्रमांची गरज अधिक आहे. आणि त्यामुळेच आमदार किशोर जोरगेवार यांनी ती नव्या जागेत, नव्या ताकदीने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हाच खरा नेता असतो. विरोधकांच्या टीकेने खचून न जाता, समाजाच्या भल्यासाठी निर्णय घेणारा नेता.
ज्यांना खरोखर शिक्षणाची काळजी आहे, त्यांनी या केंद्राला बळ द्यायला हवं होतं, टीका नव्हे. कारण विद्यार्थ्यांचं स्वप्न हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराचं साधन नसावं, ते आपलं भविष्य आहे. आणि याच भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भावनिक पत्रातून मांडल्या आहेत.
खुले पत्र – आमदार किशोर जोरगेवार यांचं विद्यार्थ्यांना साकडं
“ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे. अधिक तेजस्वीपणे.”
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या पवित्र भूमीत आपल्या करुणामयी स्पर्शाने धम्मदीक्षेचा दीप प्रज्वलित केला. ही दीक्षा केवळ धर्मग्रहण नव्हे, तर आत्मोद्धार, समता, आणि शिक्षणाच्या क्रांतीची ग्वाही होती. त्याच प्रेरणेतून शिक्षणाची नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरू केला.
या उपक्रमात 284 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन दिले जात होते. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकताच दिनांक ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला. यामध्ये ‘अम्मा की पढाई’ शिक्षा केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचे समाधान आहे. ही केवळ शैक्षणिक यशाची गोष्ट नव्हे, तर त्या मुलांच्या स्वप्नांना हात देणाऱ्या धम्मकार्याची साक्ष आहे.
मात्र, या कार्याला काही राजकीय पक्षांचा विरोध उभा राहिला. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो, त्यांचाही आम्ही मन:पूर्वक आदर करतो. परंतु हे केंद्र नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे समजवण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असू शकतो. किंवा, हा एक विधायक सामाजिक उपक्रम राजकारणाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजाच्या भोवऱ्यात सापडून बळी गेला असेल — हे सुद्धा चिंतन करण्यासारखे आहे.
उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जे तेज होतं, त्याच डोळ्यांत आज अश्रू आहेत – ही बाब अस्वस्थ करणारी आहे. स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं… आज त्यांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम मिळतो आहे, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते.
हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करत आहोत. नवीन जागेची शोधाशोध व पुनर्रचना करण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे. या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तात्पुरता थांबा लागेल, याचे दुःख आहे. आम्ही त्यांची आशा पूर्ण करू शकलो नाही, याचे मनस्वी वाईटही वाटते. पण हे कार्य इथे थांबणार नाही. कारण शिक्षण ही बाबासाहेबांची खरी दीक्षा आहे, आणि ही आमची धम्मसेवा आहे. या प्रवासात आमच्यासोबत उभं राहिलेल्या प्रत्येकाचा आम्ही ऋणी आहोत.
ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे. अधिक तेजस्वीपणे.
– तुमचा, किशोर जोरगेवार





















