Home Top News जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही-संभाजीराजे

जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही-संभाजीराजे

0
62

मुंबई : भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. लाड यांच्या या विधानानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाने आता प्रायश्चित्त करण्याची गरज आहे, अशा शब्दांत टीका केली आहे. तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लाड यांचे वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे आहे, असे म्हणत आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तसेच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानवरही आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यांनी जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.
“राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढा अशी भूमिका सर्वांत अगोदर मी घेतलेली आहे. आम्ही वेळोवेळी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलेले आहे. 30 जिल्ह्यांत आम्ही आंदोलन केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कोश्यारींना हटवण्याचे निवेदन दिले आहे. जेव्हा कोश्‍यारी पुण्यात आले, तेव्हा त्यांना काळे झेंडे स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच दाखवलेले आहेत. जोपर्यंत कोश्‍यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवू,” असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
“राज्यपाल वेळोवेळी अपशब्द काढतात. यावर भाजपाचे सरकार कशे शांत राहू शकते. कोश्‍यारी यांना महाराष्ट्रातून काढल्यानंतरच भाजपाचे शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम निश्‍चित होणार आहे. राज्यपालांविषयी उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे वेगळे नाहीत. आम्ही आंदोलनं वेगळ्या पद्धतीने करत आहोत. मात्र आम्ही दोघे एकच आहोत,” असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
“भाजपा एकीकडे शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, असे म्हणते. आम्ही राजकारण आणि समाजकारण शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच करतो, असा दावा भाजपा पक्ष करतो. मग राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी अद्याप महाराष्ट्रात कसे आहेत. भाजपाची ही दुटप्पी भूमिका आहे. भाजपा रस्त्यावर का येत नाही,” असा खोचक सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
“राज्यपालांनी जे विधान केले आहे, त्याची सर्व माहिती आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवली, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. हे काय उत्तर आहे का. त्यांची काही जबाबदारी नाही का? सरकारमध्ये असले म्हणजे बोलायचं नाही का? कोश्‍यारी यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here