Home Top News पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा- शिवसंग्रामची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा- शिवसंग्रामची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
74

शिवसंग्रामची जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे  मागणी..

बीड प्रतिनिधी  – पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यानी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले याच्यावर गुन्हा दाखल करत बडतर्फीसह कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी काल शिवसंग्रामच्यावतीने मा.जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देऊन कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जळगाव येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली,त्याचप्रमाणे मराठा समाजातील महिलांच्या बाबतीत अपमानजनक अशी वक्तव्य केली त्यावरून मराठा समाजामध्ये अतिशय रोष आणि संताप निर्माण झाला आहे त्याची दखल घेऊन बकाले यांची बदलीसह त्यांना निलंबित करण्यात आले होते. सदरची कारवाई ही अपुरी असल्याने मराठा समाजात त्याबाबतही असंतोष आहे.
शिवसंग्राम, बीड तर्फे काल सोमवार,दि.19 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी,बीड यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे  यांना शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांच्या नेतृत्वाखाली  निवेदन देण्यात आले. निवेदनात पो. निरीक्षक बकाले यांच्या वरती निलंबनाची केलेली कारवाई ही पुरेशी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली जावी. त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात यावे असे नमूद करत बडतर्फीची कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्रातील सामाजिक समीकरण, सौहार्दता टिकवायची असेल, तर अशा समाजविघातक प्रवृत्तीना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर तातडीने अतिशय कडक कारवाई होणे आवश्यक आहे. जेणेकरून हे सरकार लोकभावनांचा आदर करते, जनसामान्यांच्या या सरकार कडून असलेल्या अपेक्षांची कदर करत असल्याचाही चांगला संदेश समाजात जाईल. त्याचप्रमाणे अशा अपप्रवृत्तींच्या कारस्थानाला महाराष्ट्राची जनता बळी पडून त्यातून काही वावगे घडू नये याची काळजीही घेतली जाऊन समाजात योग्य तो सकारात्मक संदेश जाईल. यादृष्टीने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध केलेली निलंबनाची कारवाई ही अपुरी असून त्यांच्याविरुध्द सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे, सामाजिक सलोखा धोक्यात आणणे, एका जातिविशिष्टाचा अपमान करणे, स्त्रियांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी करणे, इ. साठी त्यासंबंधीच्या भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाआधारे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जावी, त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ केले जावे,तसेच त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे कार्यरत असताना त्यांनी मराठा तरुणांवर द्वेषभावनेने दाखल केलेल्या गुन्हयांची खातेनिहाय निष्पक्ष चौकशी केली जावी व त्याचे पूनरावलोकन करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, भारतीय संग्राम परिषदेचे प्रभाकर आप्पा कोलंगडे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, ऊसतोड कामगार नेते बबनराव माने,माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, गेवराई तालुका अध्यक्ष कैलास माने, नेकनूर जि प गटप्रमुख विनोद कवडे,  युवा नेते मनोज जाधव,शिवसंग्राम नेते गोपीनाथ घुमरे,संतोष पंडित, योगेश नाना शेळके, बबनजिजा जगताप, रमेशराव चव्हाण, प्रकाश दहे, सुनील डोंगर, सुभाष दहे, दुरेश यादव, विकास मराडे, केंगार बंडू, विलास मोरे,प्रवीण सुरवशे व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here