Home Top News मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वजाचे परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वजाचे परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

0
79
दिल्ली आणि मुंबईत परळीचा विकासात्मक व राजकीय दबदबा वाढावा, यासाठी आमचे प्रयत्न – धनंजय मुंडे

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर, हजारो नागरिकांनी घराच्या छतावरून दिली ध्वजाला सलामी

परळी  – परळी मतदारसंघाचा विकासात्मक व राजकीय दर्जा वाढवून परळीचा नावलौकिक व दबदबा दिल्लीत आणि मुंबईत वाढावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेज वरील डोंगरावर राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारले असून, याठिकाणी मराठवाड्यातील सर्वात उंच, तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. या तिरंगा ध्वजाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मानवंदना देऊन लोकार्पण करण्यात आले.

अत्यंत दिमाखदार अशा या सोहळ्यात 150 फूट तिरंगा ध्वजाचे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने ध्वजारोहन करण्यात आले. तदनंतर बीड पोलिसांच्या बँड पथकाने वाद्यांच्या गजरात राष्ट्रगीत गाऊन ध्वजवंदना संपन्न झाली. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमला होता. परळी शहरातील अनेक ठिकाणी नागरिक आपल्या घराच्या छतावरून या सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचे पाहायला मिळाले. व्यासपीठावर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.

दरम्यान सरकार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत असले तरी आम्ही मात्र काही महिने अगोदरच या विशाल तिरंगा ध्वज उभारणीचे व 15 ऑगस्ट च्या काळात लोकार्पण करण्याचे नियोजन केले होते. या ठिकाणी सुशोभीकरण, एल ई डी वॉल, स्क्रिन यासह अन्य कामे पूर्ण करून, परळीत येणाऱ्या प्रत्येकाला या स्थळाची भुरळ पडेल, असे काम केले जाईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमास माजी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, रा. कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, गोविंदराव देशमुख, लक्ष्मणराव पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, दीपक देशमुख, प्रा. विनोद जगतकर, अनंत इंगळे, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती नेरकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक सुंदर बोंदर, बीडीओ संजय केंद्रे, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सुरेश चाटे, स.पो.नि. महेंद्रसिंह ठाकूर, तालुका वनाधिकारी भगवान गित्ते, महसूल, पोलीस आदी विभागाचे कर्मचारी, प्राध्यापक वृंद, यांसह पदाधिकारी, अधिकारी -कर्मचारी, एनसीसी चे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी व परळीतील नागरिक मोठ्या संख्येने व उत्साहात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. ध्वज फडकण्यासाठी इलेक्ट्रिक पद्धतीने 13 मिनिटे लागल्यानंतर अत्यंत डौलाने अतिविशाल तिरंगा फडकताना पाहून उत्साह संचारणारे वातावरण तयार झाले होते; त्यात भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी, तिरंगा धारक लहानगे विद्यार्थी, पोलिसांचे बँड पथक, वैद्यनाथ महाविद्यालयातील एनसीसी पथक आदी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here