Home Top News मराठवाड्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे शक्य आहे ते करणे मी माझी...

मराठवाड्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी समजतो – जयंत पाटील

0
73

मराठवाड्याचा मागासलेपणा व दुष्काळी म्हणून ओळख पुसण्यासाठी तुम्ही मराठवाड्याचे भगीरथ व्हा, आम्ही सत्कार नाही दंडवत घालू – धनंजय मुंडे

औरंगाबाद प्रतिनिधी : विविध योजना आहेत, प्रकल्प आहेत ते येत्या काळात पूर्ण होतील आणि मराठवाड्याला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु मराठवाड्यात पाण्याची मोठी कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

मराठवाड्याकरीता मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९.२९ टीएमसी व पैनगंगा उपखोऱ्यात मराठवाडा व विदर्भाकरीता ४४.५४ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन मधल्या काळात महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने केले. याबाबत मराठवाडा अभियंता मित्र मंडळ, औरंगाबादच्यावतीने आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर यांचा सत्कार करण्यात आला.

अजय कोहिरकर यांनी जलसंपदा विभागात कार्यरत असताना अनेक चांगले निर्णय घेतले. नेहमीच त्यांच्याकडे मराठवाडा विभाग आला असल्याने त्यांना मराठवाड्याच्या पाण्याची चांगली जाण आहे. कोहिरकर यांनी निस्वार्थी मनाने शासनाची सेवा केली. असे चांगली अधिकारी मिळणे मधल्या काळात जरा दुरापास्त झाले आहे म्हणून एका चांगल्या अधिकाऱ्याचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबाबत जयंत पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले.

*तर आम्ही दंडवत घालू – धनंजय मुंडे*

गोदावरी उपखोऱ्यात 19.29 टीएमसी व पैनगंगा उपखोऱ्यात 44.54 टीएमसी पाणी उपलब्ध करून देऊन आपण मराठवाड्यासाठी भगीरथ ठरला आहात. या दोनही निर्णयांची अंमलबजावणी झाल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक रखडडलेल्या प्रकल्पांना पाणी उपलब्धी प्रमाणपत्र मिळून प्रकल्प मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुढे बोलताना ना. मुंडे म्हणाले की, सतत अवर्षण तर कधी अतिवृष्टीने ग्रस्त मराठवाड्यात कष्टकरी लोक आहेत. मागल्या व आमच्या पिढीने दुष्काळ व स्थलांतर पाहिले पण पुढच्या पिढीला ते नशिबी येऊ नये यासाठी इथे पश्चिम महाराष्ट्रचया बरोबरीने जलगंगा उपलब्ध झाली तर ऊसतोड कामगारांसह विविध कामांसाठीचे स्थलांतर कायमचे बंद होईल.

मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्र, कोकण कुठूनही पाणी उपलब्ध करा, जमिनीच्या खालून किंवा वरून कोणत्याही पद्धतीने द्या, पण पाणी द्या व ते दिल्याने भगीरथ ही उपाधी सार्थ ठरेल. आम्ही मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यासाठी आपल्याला दंडवत घालू एवढेच नव्हे तर सबंध मराठवाड्यातील जनता आपला गौरव करेल, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे यांची मागणी अत्यंत रास्त असून मी जलसंपदा मंत्री झालो तेव्हा स्वतः पवार साहेबांनी देखील मला मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाला कायमचा तोडगा काढण्याचे सूचित केले होते, असे श्री. जयंत पाटील म्हणाले.

मागच्या कालखंडात पाण्याच्या अडचणींमुळे मराठवाड्यातील काही प्रकल्प थांबले होते. मराठवाड्यातील या थांबलेल्या प्रकल्पांना गती मिळणे आता शक्य झाले आहे, पाण्याची मोठी तूट भरून निघणार आहे. या कामगिरीबाबत मला माझ्या सर्व अभियंत्यांबाबत अभिमान आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोकणातून लिफ्ट करून मराठवाड्यात पाणी आणणे शक्य आहे असे सांगतानाच जयंत पाटील यांच्याकडे हे करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे असे स्पष्ट केले.

यावेळी मंत्री सांदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कार्यक्रमाचे आयोजक आ. सतिष चव्हाण आदींनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विभागाचे कौतुक केले. यावेळी अजय कोहिरकर सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. निवृत्त सचिव गायकवाड यांनी जयंत पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी कार्यक्रमास ना. जयंत पाटील, ना. धनंजय मुंडे, ना. राजेश टोपे, ना. संदीपान भुमरे, ना. अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण, जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर, निवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड, निवृत्त सचिव तात्याराव मुंडे, शंकरराव नागरे, दीपक कंदी, बाबुराव कंदरफळे, राम घोटे, यांसह आदी उपस्थित होते. मराठवाडा अभियंता मित्र मंडळाच्या वतीने आ. सतिष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here