Home Top News पहिल्यांदाच बीडमध्ये रेल्वे धावली!

पहिल्यांदाच बीडमध्ये रेल्वे धावली!

0
97

विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे आगळे-वेगळे आंदोलन
रस्त्यावर उतरत सत्ताधाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा केला निषेध

प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू असून हे काम तात्काळ करण्यात यावे यासाठी आज विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेल्वेचा प्रतिकात्मक डब्बा बनवून तो डब्बा युवकांनी ओढला. यासह यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत तात्काळ रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लावा यासह सोलापूर-बीड-जळगाव हा नवीन मार्ग तात्काळ मंजूर करून याही कामाला सुरुवात करा अशी मागणी युवकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य काळापासून बीड जिल्ह्यात रेल्वे यासाठी येथील अनेक नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेत अनेक आंदोलने केलेली आहेत. परंतु आजपर्यंत नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही, बीडला जर रेल्वे आली तर बीड जिल्हा हा विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल व याठिकाणी असलेली बेरोजगारी यासह इतर समस्या मार्गी लागतील. यामुळे बीडला रेल्वे येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी केंद्राने 50 टक्के व राज्याचे 50 टक्के वाटा उचलायचा करार झालेला आहे. परंतु यामध्ये चालढकल होताना दिसत आहे. यामुळेच या रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने अजून किती वर्षे लागतील हा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होत आहे. या सर्व बाबीमुळेच आज विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेल्वेचा डब्बा बनवून ओढण्यात आला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात बीड जिल्हा रेल्वे मार्ग, अहमदनगर-बीड-परळी या मार्गाचे काम लवकर करावे, आजपर्यंत रेल्वेच्या खर्चाचा आराखडा जनतेसमोर मांडावा, पालकमंत्री या नात्याने हा रेल्वेमार्ग कसा पूर्ण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत याचबरोबर सोलापूर-बीड-जळगाव या रेल्वेमार्गाचे कामही तात्काळ सुरू करण्यात यावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी व शहरातील युवकांनी उपस्थिती दर्शवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here